१५ बड्या उद्योजकांना लाभ होण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय; राहुल गांधींचा मोदीवर आरोप

158

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १५ बड्या उद्योजकांना लाभ होण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला  होता. नोटाबंदीच्या एका निर्णयामुळेच देशाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. देशातील  काळा पैसा पांढरा व्हावा, हेच या मागचे मुख्य उद्दीष्ट होते, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयानंतर मोदी यांच्या उद्योजक मित्रांनी काळ्या पैशांचे रूपांतर पांढऱ्या पैशात केले. नोटाबंदी हे जनतेवरचे मोठे आक्रमण होते, तुमच्या पायावर कुऱ्हाड मारली गेली. मागील ७० वर्षात झाले नाहीष ते मोदींनी हा निर्णय घेऊन करून दाखवले. नोटाबंदीमुळे छोटे आणि मध्यम व्यापारी उद्‌ध्वस्त  झाले.  सामान्य माणसाचे कंबरडे मोडले. नोटाबंदी हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे संचालक असलेल्या गुजरातमधील बँकेत ७०० कोटींचा काळा पैसा पांढरा करण्यात आला. लोकांच्या खिशातून पैसे काढून उद्योजकांचे खिसे भरण्याचे काम मोदी यांनी केले. सामान्य माणसाची फसवणूक करण्याचे  काम  मोदी यांनी केले आहे. नोटाबंदीच्या  निर्णयामुळे काहीही साध्य झाले नाही. हा जुमला नाही, तर एक मोठा भ्रष्टाचार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.