१० लाख देऊनही काम न केल्याने मंत्रालयातील अधिकाऱ्याला मारले; अरुण निटुरेचा खुलासा   

389

उस्मानाबाद, दि. १२ (पीसीबी) – सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या खासगी सचिवाला १० लाख रुपयांची लाच दिली. त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्याला १ लाख ६० हजार रुपये दिले, तरीही आश्रमशाळेच्या अनुदानाचे काम केले नाही. त्यामुळे अधिकाऱ्याला दोन चपट्या लगावल्या, असा खुलासा संस्थाचालक अरुण निटुरे यांनी केला आहे. 

अरुण निटुरे यांने उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे २००२ मध्ये आश्रमशाळा सुरू केली आहे. या आश्रमशाळेला मान्यता आणि अनुदान मिळण्यासाठी निटुरे गेल्या तीन वर्षांपासून मंत्रालयात हेलपाटे मारत आहे. या कामासाठी त्यांनी अधिकाऱ्याला पैसेही दिल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, या कामासाठी निटुरे शुक्रवारी मंत्रालयात आले होते. यावेळी त्यांनी बडोलेंच्या कार्यालयात ‘त्या’ अधिकाऱ्याची भेट घेतली. त्या अधिकाऱ्याला कामाची विचारणा केली. शिवाय कामासाठी पैसे दिले, इतके दिवस वाट पाहिली, पण तरीही काम का होत नाही, अशी विचारणा केली. त्यावर त्या अधिकाऱ्याने मी तुझा एक पैशाचा मिंधा नाही, असे म्हणताच, अरुण निटुरे यांनी अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावली. पैसे घेऊनही मुजोरी करतोस, असे म्हणत अरुण निटुरेंनी त्याला मारहाण केली.