ह्रदयद्रावक: आईला वाचवताना दोन लेकींसह सुनेचा बुडून मृत्यू

876

नाशिक, दि. १४ (पीसीबी) – शेवाळामुळे पाय घसरून तलावात पडलेल्या आईला वाचविताना दोन मुलींसह सुनेचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१३) दुपारी तिनच्या सुमारास नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील बेळगाव ढगा शिवारातील चंद्रभागा लॉन्स पाठीमागील सुमारे २० फूट खोल पाझर तलावात घडली. या ह्रदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सासू मनीषा अरुण शिंदे (वय ४५), मुलगी ऋतुजा अरुण शिंदे (वय १६), वृषाली अरुण शिंदे (वय २१) व सून आरती नीलेश शिंदे (वय २४) असे एकाच कुटूंबातील मृत महिलांची नावे आहेत. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बेळगाव ढगा शिवारातील सुरेश शिंदे यांच्या कुटुंबीयांच्या घरात गणेशोत्सवाचा उत्साह होता. शेजारीच राहणारा त्यांचा भाऊ अरुण यांची पत्नी मनीषा, मुलगी ऋतुजा, वृषाली आणि सून आरती हे सर्व सुरेश शिंदे यांच्या घरी श्रींच्या आगमनाच्या तयारीसाठी गेले होते. त्यानंतर घरातील कपडे व भांडी धुण्यासाठी नात श्रावणी हिला सोबत घेऊन चंद्रभागा लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या पाझर तलावावर त्या गेल्या होत्या.

पाझर तलावाच्या सिमेट बांधावर शेवाळ आले असल्याने मनीषा यांचा पाय घसरून त्या २० फूट खोल पाण्यात पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी ऋतुजा, वृषाली या दोन्ही मुलींसह सून आरती याही एकमेकींना वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडाल्या. हे दृश्य बघून भेदरलेली श्रावणी धावतच घराकडे गेली व कुटुंबीयांना माहिती दिली. यावर  कुटुंबीयांनी तातडीने तलावाकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत शेजारील लोकांनी या चौघींना पाण्याच्या बाहेर काढले होते. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सातपूर पोलिस तपास करत आहेत.