ह्दयद्रावक: लग्न लावून देत नसल्याने मुलाने गळा आवळून केला आईचा खून

119

सोलापूर, दि. १५ (पीसीबी) – लग्न लावून देत नसल्याने एका तरुणाने स्वत:च्या आईचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोलापूरमधील जोडभावी पेठेत घडली. आईचा खून करुन तरुण स्वत: पोलीस ठाण्यात हजार झाला.

नागमणी (वय ५०) असे खून झालेल्या मातेचे नाव आहे. तर मोहित विजयकुमार कायत (वय २७) असे खुन करणाऱ्या मुलाचे. याप्रकरणी विजयकुमार मोतीलाल कायत (वय ५७) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायत दाम्पत्याला रोहित व मोहित ही दोन मुले व प्रीती ही मुलगी आहे. थोरला मुलगा रोहित व मुलगी प्रीती हे विवाहित आहेत. तर धाकटा मुलगा मोहित याच्या लग्नासाठी स्थळ पाहणे सुरू होते. उदरनिर्वाहासाठी कायत कुटुंबीय पुण्यात वारजे-माळवाडी येथे राहतात. मोहित हा पुण्यात ‘फूड डिलेव्हरी’च्या कामासाठी जात होता. त्याला गांजा पिण्याचे व्यसन होते. मागील महिन्यापासून त्याने गांजाचे व्यसन सोडले होते.

गेल्या ७ मे रोजी तो पुण्यातून सोलापुरात आल्यानंतर स्वत:ला मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून घरी परत आल्यानंतर रात्री घरात कायत कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले. रात्री झोपी गेल्यानंतर पहाटे मोहित याने जन्मदात्या आईचा लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरुन गळा दाबून खून केला. या घटनेनंतर तो स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.