“हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!!”

34

मुंबई, दि.१३ (पीसीबी) : तब्बल दोन वर्षानंतर बीडमध्ये भगवान गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला भाजप नेत्या पंकजा मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. स्वत: खासदार प्रीतम मुंडे यांनी काल या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही एक व्हिडीओ ट्विट करून समर्थकांना भगवानगडावर दसरा मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!!, असं पंकजा मुंडे या व्हिडीओतून सांगताना दिसत आहेत.

पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी समर्थकांना दसरा, दसऱ्याची परंपरा, भगवानगडाचं महत्त्व, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं भगवान गडाशी असलेलं नातं आणि त्यांचं स्वत:चं भगवानगड आणि दसरा मेळाव्याशी असलेलं नातं यावर प्रकाश टाकला आहे. तसेच आपल्या समर्थकांना त्यांनी अत्यंत भावनिक आवाहन करून दसरा मेळाव्याला येण्याचं आवतन दिलं आहे.

‘तुम्ही आदेश द्यायचा आणि मीच झेलायचा हे आपलं नातं आहे. तुमचा आदेश आला… ताई मेळावा झालाच पाहिजे… मेळावा झालाच पाहिजे… तुमचा आदेश आला… ताई संघर्ष केलाच पाहिजे… संघर्ष केलाच पाहिजे… मी संघर्ष केला. तुमचा आदेश आला वाडी वस्त्यावरच्या रस्त्यावरचं काय?…. वाडी वस्त्यावर रस्ते पोहोचले… तुमचा आदेश आला शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं त्याचं काय?… शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये विमा पोहोचला, अनुदान पोहोचलं. तुमचा आदेश आला मुलींचा जन्मदर घटतोय त्याचं काय?… बेटी बचाव, बेटी पढावमध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्याचं काम सुरू आहे. तुमचा आदेश आला आणि ऊस तोडण्याच्या कोत्याला मान देण्याचा प्रयत्न केला गेला… तुमच्या आदेशासाठी अनेकवेळा मी मान खाली घातली आणि तो आदेश ऐकला… पण तुमची मान कधी खाली जाऊ दिली नाही. मी सत्तेच्या मंचावर असेल नाही तर विरोधात असेल, तुम्ही माझ्यावर कधी माया पातळ केली नाही. तुम्ही म्हणालात त्या प्रत्येक लढ्यात तुमच्यासमोर उभे राहिले, कारण माझ्यामागे तुम्ही होतात… आपलं नातंच असं आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं. आताही तुम्हीही म्हणालात ताई आपली परंपरा जपली पाहिजे. भगवानबाबांच्या भक्तीची आणि मुंडे साहेबांच्या शक्तीची परंपरा… मुंडे साहेबांना दर दसऱ्याला कधी मुंबई तर कधी दिल्ली दिसायची. मला मात्र दसऱ्याला भव्य जनसागरामध्ये केवळ अन् केवळ भगवानबाबांचे आशीर्वाद आणि मुंडे साहेबांची मूर्ती दिसते. आताही तुम्ही सांगितलं मेळावा झाला पाहिजे आणि 15 ऑक्टोबरला भगवान बाबांची भक्ती आणि मुंडे साहेबांची शक्ती या परंपरेसाठी मी येत आहे सावरगाव भगवान भक्ती गड येथे. आपल्या सर्वांची मी वाट पाहत आहे,’ असं भावनिक आवाहन पंकजा यांनी या व्हिडीओतून केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ 2 मिनिटं 13 सेकंदाचा आहे. या व्हिडीओत आधीच्या दसरा मेळाव्यांचे क्षणचित्रं आहेत. तसेच भगवान गडावरीलही क्षणचित्रे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भगवान गडावर आले होते, त्याचे फोटो आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे फोटो, विराट जनसागर, शेती करणारे शेतकरी, ऊस कामगार, विकास कामे आदींचे फोटोही या व्हिडीओत आहेत. तसेच या फोटोंच्या पार्श्वभूमीवर मंद्र संगीताचे स्वर ऐकू येतात आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांचं भावनिक आवाहन. या व्हिडीओला आतापर्यंत 3 हजार 800 लाईक्स मिळाले आहेत. त्यावर 50 जणांनी रिप्लाय दिला आहे. तर 98 जणांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान भक्तीगडावरील 12 एकर परिसरात होणार आहे. मेळाव्याआधी गड परिसरातील डागडूजी आणि इतर कामांनी वेग घेतला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे संत भगवान बाबांच्या भव्य मूर्तीच्या खाली असलेल्या गर्भगृहात पाणी साचले होते, तेही बाहेर काढण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी पाणी साचणारच नाही अशी कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. हा परिसर वॉटर प्रुफ करण्यात येत आहे. मेळाव्यास राज्याच्या कानाकोपर्‍यातून तसेच बाहेरूनही मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा मेळावा पार पडणार आहे.

दसरा मेळावा आमची परंपरा आहे. यावर्षी मंदिर खुली झाली आहेत. यावर्षी दसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळावा हा कार्यक्रम राजकीय नाही. अनेक जण सहभागी होतात. अनेक लोक सहभागी होतात. नेता असो की कार्यकर्ता सर्व सहभागी होतात, असं सांगतानाच मी काय बोलेन ते दसरा मेळाव्यात नक्की ऐकायला या. लोकांच्या उत्साहासाठी हा मेळावा होतो, काय बोलायचं ते उत्स्फूर्त बोलेन, असं पंकजा यांनी काल सांगितलं होतं. दसऱ्याच्या आधी नुकसान भरपाईची घोषणा केली तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. पंकजा मुंडे यांनी उत्स्फूर्त भाषण करेन असं सांगून त्यांच्या भाषणाबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढवला आहे.

WhatsAppShare