हॅशटॅग मानसिकतेच्या लोकांनी टुकडे, तुकडे असा शब्द प्रयोग केला – कन्हैय्या कुमार

163

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – भारत तेरे टुकडे होंगे, असे शब्द आम्ही कधीही वापरले नाहीत. हॅशटॅग मानसिकतेच्या लोकांनी टुकडे, तुकडे असा शब्द प्रयोग केला आहे, असा खुलासा कन्हैय्या कुमारने आज (बुधवारी) मुंबईत केला . जेएनयूमध्ये भारत तेरे टुकडे होंगे ही घोषणा दिल्याच्या आरोपावर  कन्हैय्या कुमारने  उत्तर  दिले आहे.

विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी त्यांने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला चढवला.

विरोधकांची जशी विचारसरणी आहे तसेच ते बोलत आहेत. बेरोजगारीच्या मुद्यापासून लक्ष वळवण्यासाठी भाजपकडून अशा शब्दांचा वापर केला जात आहे, असे कन्हैय्या कुमार म्हणाला. जेएनयूमध्ये अफजल गुरुचा स्मृतीदिन साजरा केला नाही. मी त्या कार्यक्रमाचा संयोजक नव्हतो तसेच त्यावेळी तिथे हजर सुद्धा नव्हतो, असे कन्हैय्या कुमारने सांगितले.

जेएनयूमधल्या ज्या कार्यक्रमावरुन मोठा वादंग झाला त्याला वरिष्ठांनी परवानगी दिली होती. त्या कार्यक्रमाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देशविरोधी कार्यक्रमाचे लेबल चिटकवले. तो कार्यक्रम देशविरोधी असल्याचे त्यांना कसे कळले ठाऊक नाही असे कन्हैय्या कुमार म्हणाला. माझ्यासमोर कोणी देशविरोधी घोषणा देणार असेल तर या देशाचा नागरिक या नात्याने मी नक्कीच त्यांना रोखेन. जेएनयूमध्ये घोषणाबाजीवरुन वाद झाला त्यावेळी मी तिथे नव्हतो असे कन्हैय्या कुमारने सांगितले.