ही पोस्टरबाजी भाजपाच्याच अंगलट आली

18

नवी दिल्ली, दि. 23 (पीसीबी) : मोदी सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना होत असलेला विरोध अजूनही मावळलेला नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून, नव्या कृषी कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी भाजपाने केलेल्या जाहिरातबाजीचा फज्जा झाला आहे. भाजपाने जाहिरातीत दाखवलेला शेतकरीच दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात धरणे देत आहे. त्यामुळे ही पोस्टरबाजी भाजपाच्याच अंगलट आली असून, पक्षाकडून ते पोस्टरही हटवण्यात आलं आहे. नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. तिन्ही कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे मोदी सरकार व भाजपाकडून तिन्ही कायद्यांचे फायदे पटवून देण्याचं काम केलं जात आहे. याचसाठी पंजाब भाजपानं हरप्रीत सिंह यांचा फोटो वापरून कायद्यांचे फायदे सांगणार पोस्टर तयार केलं आहे. यात हरप्रीत सिंह यांना सुखी शेतकरी म्हणून दाखवण्यात आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे स्वतः हरप्रीत सिंह हेच सध्या सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात धरणे देत आहेत. हरप्रीत सिंह यांच्या या पोस्टरविषयी सोशल मीडियात प्रचंड चर्चा सुरू आहे. त्या पोस्टरवरून टीका सुरू झाल्यानंतर पंजाब भाजपानं हे पोस्टर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून डिलीट केलं आहे.

हरप्रीत सिंह यांचा फोटो पोस्टरवर कसा?

भाजपाने पोस्टरवर वापरलेला हरप्रीत सिंह यांचा फोटो सहा ते सात वर्षांपूर्वीचा आहे. हाच फोटो पोस्टरवर वापरण्यात आला असून, तो हरप्रीत सिंह यांच्या परवानगी विनाच वापरण्यात आलेला आहे. सिंह यांनीच हा दावा केला आहे. “मी सिंघू बॉर्डर आंदोलन करत असताना भाजपाने हा फोटो वापरला आहे,” असं हरप्रीत सिंह यांनी म्हटलं आहे. “नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकरी खुश नाहीत. भाजपा प्रणित सरकार एकदाही सिंघू बॉर्डरवर आलेली नाही. शेतकरी या कायद्यांविरोधात का आहे, हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला नाही. शेतकऱ्यांचा या कायद्यांना विरोध आहे आणि दिवसेंदिवस त्यांचा राग वाढत चालला आहे,” असं हरप्रीत सिंह यांनी म्हटलं आहे.

WhatsAppShare