“ही औषधाची डबी घ्या… संतती प्राप्ती होईल” असं म्हणत घातला ३३ हजारांना गंडा, सत्य समोर आल्यावर…

105

चाकण, दि. 26 (पीसीबी) – संतती प्राप्तीसाठी एकाला हजारो रुपयांची औषधे दिली. त्यातून व्यक्तीची फसवणूक केली. ही घटना 5 फेब्रुवारी 2021 रोजी च-होली खुर्द येथे घडली.

दीपक अशोक वर्मा (वय 39, रा. मरकळ रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी 25 डिसेंबर 2021 रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लक्ष्मण मोहन घोडके (वय 22, रा. चांदुस, ता. माढा, सोलापूर), एल एम घोडे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण घोडके याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चाकण येथील एका कंपनीत नोकरी करतात. 5 फेब्रुवारी रोजी ते कामावर असताना त्यांच्या पत्नीने फोन करून घरी दोन व्यक्ती आले असून ते संतती स्पेशालिस्ट असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे औषध असून ते घेतल्यास संतती होईल, अशी ते खात्री देत असल्याचे फिर्यादी यांच्या पत्नीने फोनवरून सांगितले. याप्रकरणी घरी आल्यानंतर चर्चा करू व औषध घेऊ असे फिर्यादी यांनी सांगितले.

रात्री घरी आल्यानंतर आरोपी पुन्हा फिर्यादी यांच्या घरी आले. एका व्यक्तीने एम एल घोडे नावाचे व्हिजिटिंग कार्ड फिर्यादी यांना दिले. अनेकांना त्यांच्या औषधाचा फायदा झाला असून हा त्यांचा पिढीजात व्यवसाय असल्याचे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना औषधाची लहान डबी दिली. त्यापोटी आरोपींनी 33 हजार रुपये घेतले. फिर्यादी यांच्या पत्नीने ते औषध घेतले मात्र त्यांना औषधाचा गुण आला नाही.

शुक्रवारी (दि. 24 डिसेंबर) फिर्यादी यांच्या चुलत भावाने फिर्यादी यांना फोन करून सांगितले की, एक व्यक्ती संतती प्राप्तीचे औषध घेऊन आला आहे. तुम्हाला फसवलेला हाच व्यक्ती आहे का, हे पाहण्यासाठी ये’. त्यानुसार फिर्यादी यांनी पाहिले असता आरोपी लक्ष्मण घोडके हा असल्याचे निष्पन्न झाले. फिर्यादी यांनी घोडके याला पकडून ठेवले आणि पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घोडके याला ताब्यात घेऊन फिर्यादी यांची फसवणुकीची फिर्याद घेतली. आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस फौजदार दत्ता टोके तपास करीत आहेत.