हिना गावीत यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

319

धुळे, दि. ८ (पीसीबी) – नंदुरबारच्या भाजप खासदार हिना गावित यांच्या गाडीची तोडफोड  केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरून धुळ्यात संतप्त आंदोलकांनी गावित यांच्या  गाडीवर हल्ला चढवला होता. तसेच त्यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. हा मुद्दा हिना गावीत यांनी लोकसभेत उपस्थित करून   हल्लेखोरांवर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच एखाद्या महिलेला सुरक्षा देता येत नसेल, तर तेथील पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली होती. दरम्यान,  धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. तर हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ‘आम्ही छत्रपतीच्या शिवरायांच्या विचारांचे आहोत. परस्त्रीचा सन्मान केला पाहिजे, तिला माता भगिनी समान मानले पाहिजे. कोणत्याही महिलेविरुद्ध मराठा समाजातील कोणताही कार्यकर्ता अशाप्रकारे कृत्य करणार नाही, ज्यामुळे त्या महिलेला त्रास होईल किंवा तिला वेदना होईल किंवा तिच्या जिवाला धोका पोहचेल. आमच्या मनात कोणाबद्दल काहीही नव्हते, असे स्पष्टीकरण मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी या हिना गावीत यांच्या हल्ल्याबद्दल दिले  आहे.