‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ संघटनेचा कमांडर मन्नान बशीर वानी चकमकीत ठार

102

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) – जम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या  चकमकीत ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेचा कमांडर  मन्नान बशीर वानी ठार झाला. मन्नान हा अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील (एएमयू) पीएचडीचा विद्यार्थी होता. पीएचडी सोडून तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

हंदवाडामधील शाहगूंड या गावात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कमांडर मन्नान बशीर वानी याच्या साथीदाराला पोलिसांनी शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी गोळीबार केला आणि यानंतर झालेल्या चकमकीत दोघांचाही खात्मा करण्यात आला.

दरम्यान, पीएचडीचा विद्यार्थी असलेल्या वानीचा मृत्यू झाल्याने शेवटी आपलेच नुकसान झाले आहे. सुशिक्षित तरुणांनी दहशतवादी मार्ग स्वीकारणे दुर्दैवी आहे. सर्व राजकीय पक्षांनी याचे गांभीर्य ओळखण्याची गरज आहे. शांततेसाठी पाकिस्तान व अन्य घटकांशी चर्चा झालीच पाहिजे’, अशी मागणी पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी  केली आहे.