मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव – शरद पवार

298

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  मराठा आंदोलनाला बदनाम करून मराठा आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव हाणून पाडा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर हिंसक, जाळपोळीचे प्रकार थांबवून मराठा आंदोलकांनी शांतता राखण्यावर भर  द्यावा’, असे आवाहनही पवार यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.  

मराठा आंदोलनाला बहुजनांचा पाठिंबा मिळाला असून  त्याला धक्का लागू देऊ नका. याबाबत  मराठा आंदोलकांनी दक्षता घ्यावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातींना आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. त्या आदर्शांना धक्का न लावता आंदोलन करा, असेही पवारांनी म्हटले आहे.

मराठा समजाला बहुजन समाज व इतर समाजापासून वेगळे करण्याचा राज्यकर्त्यांचा डाव सुरू आहे. त्यांची ही खेळी यशस्वी होऊ देऊ नका, असे सांगून आरक्षणासाठी काही संविधानिक प्रक्रिया असते.   त्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी शांतता राखणे गरजेचे आहे. राज्यांतील उद्योगातील गुंतवणूक थांबून बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होईल, असे आंदोलन करू नका, असेही पवारांनी आवाहन केले आहे.