हिंमत असेल तर सरकार बरखास्त करा, मग बघू कोण निवडून येतंय – भारत भालके   

311

पुणे, दि. २८ (पीसीबी) – हिंमत असेल तर सरकार बरखास्त करून टाका,  मग बघू पुन्हा कोण निवडून येतंय,  असे थेट आव्हान सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे  काँग्रेस आमदार भारत भालके यांनी दिले आहे. मराठा आरक्षणासाठी  बैठक बोलवण्यापेक्षा तीन दिवसांचे अधिवेशन बोलवा, असा सल्लाही भालके यांनी  सरकारला दिला.  

इंदापूर प्रशासकीय भवनासमोर मराठा मोर्चाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलकांची भेट घेतल्यानंतर  भारत भालके यांनी सरकारवर निशाणा साधला.

“हिंमत असेल तर सरकार बरखास्त करा, त्यानंतर कोण निवडून येतेय बघू. आम्ही निवडून येऊ आणि आरक्षण देऊ. आरक्षणासाठी आता जीव चाललेत, तरुण मरायला लागलेत”, असे भालके  यावेळी म्हणाले. मराठा आरक्षणासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मात्र,  बैठक बोलावण्यापेक्षा  तीन दिवसांचे अधिवेशन बोलवा, तसा स्वतंत्र अधिकार आहे, कायद्यात तरतूद आहे,  आम्हाला आमच्या भूमिका मांडू द्या, असे   भालके यांनी स्पष्ट केले .

पंढरपुरात पूजेला विरोध करणारी,  गोंधळ घालणारी माणसे माझी असून, त्यांची नावे माहित आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केल्याचे भालके म्हणाले.  दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भालके यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे  पत्र देऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.