“‘हिंदू खतरे में है’ हा जर जुमला होता, तर या प्रकरणी भाजपवर 302 खाली गुन्हा दाखल करावा”

43

मुंबई, दि.२४ (पीसीबी) : ‘हिंदू खतरे में है’ ही निव्वळ कल्पना होती, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे. केंद्रीय माहिती अधिकाऱ्याने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीत हा खुलासा केला आहे. त्यामुळे काँग्रेसने त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदू खतरे में है हा जर जुमला होता तर या प्रकरणी भाजपवर 302 खाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. “हिंदू धर्म संकटात आहे” हा भाजपाचा जुमलाच होता हे स्वतः अमित शहांच्या गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पण या भयानक जुमल्यातून भाजपाने सत्तेसाठी विद्वेषाचे वातावरण पसरवले. धार्मिक उन्मादातून देशात मॉब लिंचिंग झाले, हत्या झाल्या. त्याबद्दल भाजपा नेत्यांवर 302 चे गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

नागपूरचे रहिवाशी मोहनीश जबलपुरे यांनी 10 सप्टेंबर 2021 रोजी माहितीच्या अधिकारातून केंद्रीय माहिती अधिकाऱ्याला एक प्रश्न होता. हिंदू खतरे में है असं सांगितलं जात आहे. त्याबद्दलची माहिती आणि पुरावे द्यावेत, अशी मागणी जबलपुरे यांनी केली होती. त्यावर माहिती अधिकाऱ्याने हे उत्तर दिलं आहे. काल्पनिक प्रश्नांना उत्तर देणं हे आमचं काम नाही. तसेच तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही आमच्याकडे नाही, असं सांगतानाच त्यामुळे तुम्ही गृहखात्याकडे त्याची विचारणा करावी, अशा सूचनाही माहिती अधिकारी व्ही. एस. राणा यांनी जबलपुरे यांना केली आहे.

दरम्यान, सोयाबीनच्या भावावरूनही सावंत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. सोयाबीनचे भाव सातत्याने पडत आहेत. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने 12 लाख टन सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. डाळींबाबतही मोझांबिक सारख्या देशांना फायदा व्हावा याकरिता मोदी सरकारने करार केला होता. शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हेच मोदी सरकारचे धोरण आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. एकेकाळी शेतकरी दिंडी काढून चिपळ्या वाजवत शेतकऱ्याची कणव आहे, असे दाखवून सोयाबीनला भाव मागणारे देवेंद्र फडणवीस मोदी सरकारचा निषेध करणार का? सोयामील आयातीचा निर्णय थांबवण्यास मोदींना भाग पाडणार का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

WhatsAppShare