‘हिंदुत्त्वाचा अतिरेक देशासाठी घातक’- दिग्विजय सिंग

53

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – धार्मिक अतिरेक हा दहशतवादाकडेच जातो, झिया-उल-हक या पाकिस्तानातील कट्टर संघटनेमुळे तिथे दहशतवाद वाढीला लागला. अगदी असेच उदाहरण भारतातही बघायला मिळते आहे. देशात हिंदुत्त्वाचा अतिरेक होतो आहे, ही बाब देशासाठी घातक असून त्याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला. एका वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. देशात हिंदुत्त्वाचा अतिरेक केला जातो आहे, ही परंपरा भारतासाठी चांगली नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपाने २०१९ च्या निवडणुका जिंकल्या तर आपल्या लोकशाहीला धोका निर्माण होईल आणि भारत हिंदू पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केले होते. त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तसेच यासंबंधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशीही मागणी भाजपाने केली होती. हा वाद शमतो न शमतो तोच काँग्रेसचे वाचाळवीर अशी ख्याती असलेल्या दिग्विजय सिंग यांनीही पाकिस्तानचे उदाहरण देत हिंदुत्त्वाचा अतिरेक देशासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.

दिग्विजय सिंग यांनी याआधीही अशीच वक्तव्ये केली आहेत. बाटला हाऊस एन्काऊंटरवर संशय घेणे असेल किंवा दहशतवादी हाफिज सईदला हाफिजजी म्हणत केलेला उल्लेख असेल त्यांच्या अनेक वक्तव्यांतून वाद निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी मोदी सरकार हिंदुत्त्वाचा अतिरेक करत असून ते देशासाठी घातक असल्याचे म्हटले आहे.