हिंजवडी भूमकर चौकातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपाचे बदल; नागरिकांना सूचना आणि हरकती पाठवण्याचे पोलिसांचे आवाहन

745

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी म्हणून पोलीस आयुक्तालयाकडून भूमकर चौकामधील वाहतुक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपाचे बदल करण्यात आले आहेत. सोमवार (दि. १७) ते बुधवार (दि. २६) दरम्यान हा बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी काढले आहेत.

नागरिकांनी आपल्या सूचना आणि हरकती येत्या दहा दिवसात पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, ऑटो क्लस्टर येथे लेखी स्वरूपात पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सूचना आणि हरकती लक्षात घेऊन अंतिम आदेश काढण्यात येणार आहे.

भूमकर चौकातील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपाचे करण्यात आलेले  बदल पुढील प्रमाणे –

*हिंजवडी गावातून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांनी सरळ जाऊन काळा खडक येथून यूटर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

*डांगे चौकाकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना भूमकर चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या वाहन चालकांनी सरळ जाऊन मारुंजी वाय जंक्शन येथून यूटर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

*शनी मंदिर येथून सर्व्हिस रोडने (सेवा रस्ता) भूमकर चौकात येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

*सयाजी हॉटेल येथून सर्व्हिस रोडने (सेवा रस्ता) भूमकर चौकात येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.