हिंजवडी परिसरातील वाहतुक व्यवस्थेत बदल; नागरिकांना सुचना आणि हरकती मांडण्यासाठी आयुक्तांचे आवाहन

524

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – हिंजवडी परिसरातील वाहतुक सुरळीत आणि सुरक्षीत करण्यासाठी वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्याबाबतचे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून सोमवारी (दि. ३) काढण्यात आले आहे.

या आदेशामध्ये शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज एक ते जॉमेट्रीक सर्कल चौक ते शिवाजी चौक अशी चक्राकार एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. ही वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आली असून याबाबत नागरिकांनी रविवार (दि. ९) पर्यंत सूचना व हरकती पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडे जमा करावेत, असे आवाहन आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी केले आहे.

दरम्यान, तात्पुरत्या चक्राकार वाहतुकीमध्ये पोलीस वाहने, रुग्णवाहिका आणि आग्निशमन दलाचे बंब यांच्याबाबत तात्पुरते निर्बंध लागू नसतील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्याच्या चक्राकार एकेरी वाहतूक मार्गावर पूर्वीचे काही निर्बंध असतील, तर ते देखील रद्द करण्यात आले आहेत.

सध्या तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेले बदल पुढील प्रमाणे –

* शिवाजी चौकातून उजवीकडे वळण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.

* शिवाजी चौकातून डावीकडे वळून विप्रो सर्कल फेज एक मधून उजवीकडे वळून जॉमेट्रीक सर्कल चौकातून सर्व प्रकारच्या वाहनांना इच्छित स्थळी जात येईल.

* भूमकर चौकातून शिवाजी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या सर्व वाहनांनी शिवाजी चौकातून सरळ विप्रो सर्कल फेज एक मधून इच्छित स्थळी जाता येईल.

* माणगाव रोडवरून विप्रोसर्कल फेज एक चौकातून शिवाजी चौकाकडे सरळ जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्या सर्व वाहनांनी डावीकडे वळून जॉमॅट्रिक सर्कल येथून इच्छित स्थळी जात येईल.

* फेज – २ आणि फेज – ३ कडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जॉमेट्रीक सर्कल चौकातून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांनी सरळ शिवाजी चौकातून इच्छित स्थळी जावे.

* मेझा – ९ चौकातून सर्व प्रकारच्या वाहनांना उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांनी डावीकडे वळून शिवाजी चौकातून इच्छित स्थळी जावे.