रस्ता ओलांडत असता एका अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. ११) सायंकाळी सहाच्या सुमारास बालेवाडी गेट, बेंगलोर-मुंबई महामार्गावर घडली.

रुपेश कुमार तिवारी (वय २०, रा. भूमकर चौक, हिंजवडी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुमताज मनसुरी (वय २०, रा. भूमकर चौक, हिंजवडी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रुपेश तिवारी हा बुधवारी (दि.११) सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावरील बालेवाडी गेट समोरुन पायी जात होता. बालेवाडी गेटसमोर तो रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने रुपेशला जोरदार धडक दिली. या धडकेत रुपेश गंभीर जखमी झाला व त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता वाहनासह पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.