हिंजवडीत वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्यावर धडक कारवाई

558

  चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – हिंजवडीतील वाहतूक कोंडी  सोडवण्यासाठी अनेक  उपाययोजना केल्या जात  आहेत.  वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हिंजवडीतील शिवाजी चौक रस्त्यांवरील टपऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज (शनिवारी) सकाळी पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए)ने केली. 

हिंजवडीमधील शिवाजी चौकातून दररोज सुमारे दोन ते अडीच लाख वाहने धावतात. त्यामुळे दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत आहे. त्यात येत्या काही दिवसात मेट्रो आणि रस्त्यांचे काम सुरु होणार आहे. सध्या ही अवस्था असेल तर काम सुरु झाल्यानंतर अतिशय बिकट अवस्था होईल. रस्ते कमी देखील पडतील. त्यातच या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर टपऱ्या असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.

पोलिसांनी काही दिवसांपुर्वीच नव्या नियोजनानुसार शिवाजी चौक ते विप्रो सर्कल फेज एक ते जिओमेट्रिक सर्कल चौक आणि शिवाजी चौक अशी चक्राकार वाहतूक करण्यात आली आहे. त्यातच आज (शविवारी) अनाधिकृत टपऱ्यावर सकाळपासूनच पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए)ने हातोडा चालविला आहे. दरम्यान, जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली जात असून कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंजवडी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.