हिंजवडीत मोबाईल चोरणाऱ्या टोळीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

104

हिंजवडी, दि. १४ (पीसीबी) – चोरीचे तब्बल २ लाख १९ हजार रुपये किमतीचे एकूण २२ मोबाईलसह हिंजवडी पोलिसांनी परराज्यातील एका टोळी जेरबंद केली आहे.

अनारूल, साबीर, अस्माउल, इलियास असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिमालया मोबाईल शॉपीवर संबंधित आरोपींनी दरोडा टाकला होता. याप्रकरणी, त्यांचा कसून तपास सुरू होता. दरम्यान, हिमालया या मोबाईल शॉपीमधील एक मोबाईल सुरू झाल्याने तांत्रिक माहिती पोलिसांना मिळाली. यामध्ये आरोपी मोहम्मद रफिक आलम याचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केली. चौकशी दरम्यान त्याला हा मोबाईल कुठून घेतला विचारले असता आंबेगाव खुर्द येथील मित्र अनारूल ईनाबूल हक (वय २०) याच्याकडून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी चौघाही आरोपींना अटक करुन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिमालया मोबाईल शॉपी फोडल्याचे कबूल केले. दरम्यान आरोपी अनारूल हकने घरी ठेवलेले काही मोबाईलही हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक गायकवाड, कुणाल शिंदे, सुभाष गुरव, हनुमंत कुंभार यांच्या पथकाने केली.