हिंजवडीत महाविद्यालयीन तरुण-तरुणीचा अपघाती मृत्यू

206

चिंचवड, दि. १८ (पीसीबी) – दुचाकीवरुन चाललेल्या तरुण-तरुणीला भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री उशीरा दोनच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्ग वाकड येथील ऑर्चिड हॉटेलसमोर घडली.

आरती वानखेडे (वय २२, रा. साठेवस्ती लोहगाव) आणि निखील गजानन क्षीरसागर (वय २३, रा. धनकवडी, पुणे) असे मयत दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सुमीत बाळु वानखेडे (वय २१, रा. साठेवस्ती लोहगाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आरती आणि निखील हे दोघेही पर्वती येथील शाहू महाविद्यालयात शिकत होते. बुधवारी रात्री उशीरा दोनच्या सुमारास ते दोघे अॅक्टीव्हा दुचाकी (क्र.एमएच/१२/पीआर/८०१३) वरुन मुंबई-पुणे महामार्गावरील ऑर्चिड हॉटेलसमोरील रस्त्यावरुन चालले होते. यावेळी भरधाव अज्ञात वाहनचालकाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आरती आणि निखील या दोघांचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालक फरार झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक नामदेव अंगज तपास करत आहेत.