हिंजवडीत बेकायदेशीर सुरु असलेल्या हुक्का पार्लवर कारवाई

397

हिंजवडी, दि. ७ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हॉटेल कॅसिनोयो येथील हुक्का पार्लरवर धाड टाकून हिंजवडी पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.

हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी कॅसिनोयो हॉटेलच्या व्यवस्थापक यतीन दिनेश शहा (वय २८), मोहित शाम दुर्गे (वय २१), श्रीकांत मारुती बागडे (वय ३९) आणि ओंकार सुतार (सर्व रा. बावधन, पुणे) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एका खबऱ्या मार्फत हिंजवडी पोलिसांना बावधन येथील हॉटेल कॅसिनोयो मध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यावर हिंजवडी पोलिसांनी कॅसिनोयो हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांनी हॉटेलमधून हुक्काचे साहित्य जप्त केले आहे. तसेच हॉटेल कॅसिनोयोच्या व्यवस्थापकासह तिघांवर बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करत आहेत.