हिंजवडीत अज्ञात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

414

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – हिंजवडीत अज्ञात पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार (दि.१३) सकाळी पावनेसातच्या सुमारास हिंजवडीतील भुमकर चौक रोड येथील हॉटेल कस्तुरी समोर घडली.

आरिफ अल्लाउद्दीन तांबोळी (वय २८, रा. वाकड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडीचे पोलीस निरीक्षक इम्राण सैय्यद यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात पाण्याच्या टँकरचालका विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पावनेसातच्या सुमारास मयत आरिफ तांबोळी हा तरुण त्याच्या दुचाकीवरुन कामाला जाण्यासाठी घरातून निघाला होता. यावेळी तो हिंजवडीतील भुमकर चौक रोड येथील हॉटेल कस्तुरी समोर पोहचला असता एका भरधाव पाण्याच्या टँकरणे आरिफ याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये आरिफ याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी टँकर चालक टँकरसह फरार झाला. हिंजवडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.