हिंजवडीतून तरुणी आणि तिच्या मित्राचे अपहरण; चौघांना अटक

156

हिंजवडी, दि. १३ (पीसीबी) – कारमधून घरी निघालेल्या तरुणी आणि तिच्या मित्राचे चौघाजणांनी मिळून अपहरण केले. तसेच त्यांना दमदाटी केली. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.१२) दुपारी दीडच्या सुमारास हिंजवडीतील भूमकरवस्ती येथे घडली.

याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हरीश सिद्धू पाटील (वय २३, रा. बिबवेवाडी), आनंद मोहन खरात (वय २१, रा. टिंगरेनगर), योगेश प्रकाश म्हस्के (वय २१, रा. विमाननगर) आणि विजय रमेश पाटील (वय २४, रा. चंदननगर) या चौघांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीडच्या सुमारास फिर्यादी तरुणी तिच्या मित्रासोबत कारमधून घरी जात होती. त्यावेळी आरोपींनी काहीही कारण नसताना त्यांची कार अडवली. तुम्ही लॉजमधून बाहेर आले आहेत काय?, अशी विचारणा करत जबरदस्तीने त्यांच्याच कारमध्ये बसून त्यांचे अपहरण केले. त्यांना विमाननगर येथे नेऊन दमदाटी केली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी चौघा आरोपींना अटक करुन दोघांची सुटका केली आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.