हिंजवडीतील बारामती ज्वेलर्सच्या दुकानाला भगदाड पाडून चोरट्यांनी पळवले ८० हजारांचे दागिने

174

चिंचवड, दि. २९ (पीसीबी) – हिंजवडी येथील शिवाजी चौकात असलेल्या बारामती ज्वेलर्सच्या भिंतीला मोठे भगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी सोन्‌या चांदीचे एकूण ८० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले आहेत. ही चोरी मंगळवारी (दि.२८) रात्री अकरा ते आज बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान झाली.

याप्रकरणी दुकानाचे व्यवस्थापक संतोष मधुकर लोळगे (वय ३७, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मंगळवारी रात्री बारामती ज्वेलर्सचे व्यवस्थापक आणि तेथील काही कामगार हे नेहमी प्रमाणे रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करुन घरी गेले. आज बुधवार लोळगे हे सकाळी दहाच्या सुमारास दुकान उघडण्यास गेले असता त्यांना दुकानाच्या भिंतीला मोठे भगदाड पाडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे एकूण ८० हजारांचे दागिने चोरुन नेल्याचे निद्रशनास आले. त्यांनी तातडीने घटनेची माहिती हिंजवडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटना स्थळी पहाणी केली असून आरोपींचा शोध घेत आहेत.