हिंजवडीतील “त्या” महिलेचा मृत्यू अपघात नसून खून; पैशांच्या वादातून भावानेच दिले पेटवून

196

हिंजवडी, दि. १४ (पीसीबी) – रविवारी ९ सप्टेंबर २०१८ रोजी हिंजवडीतील ४४ वर्षीय संगीता हिवाळे यांचा कारमध्ये पेटून मृत्यू झाला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात संगीताचा भाऊ जॉन डॅनिअल बोर्डे(वय ४०) याने विम्याच्या ३० लाख रुपयांसाठी संगीता हिच्या अंगावर रॉकल ओतून कार पेटवून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे.  

याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी भाऊ जॉन याला अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सप्टेंबर २०१८ रोजी आरोपी जॉन आणि संगीता यांचे पैशावरुन भांडण झाले होते. रागाच्या भरात त्याने बहिणीचे डोक जमिनीवर आपटले. यावेळी घरात दोघांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने जॉनने तिला कारमध्ये बसवले. संगीता यांचा मुलगा सायमन आणि आई माया यांनाही जॉनने सोबत घेतले. कात्रज-देहू रोड बायपासवर गाडीत बिघाड झाल्याचे सांगत जॉन खाली उतरला. सायमन आणि आईलाही त्याने गाडीतून खाली उतरवले. तर संगीता बेशुध्द असल्यामुळे गाडीतच बसून होत्या. काही वेळाने सायमन आणि आईचे लक्ष नसल्याचे पाहून जॉनने दहा लीटर केरोसिन संगीता यांच्या अंगावर आणि गाडीवर ओतले आणि कार पेटवून दिली.

आरोपी जॉनही बहिणीला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा बनाव करत होता. मात्र, सीएनजी कारला आग लागल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. तपासणीत पोलिसांना केरोसीनचे अवशेष आढळले आणि पोलिसांनी जॉनची कसून चौकशी केली. विम्याचे तीस लाख रुपये मिळावेत, यासाठी बहिणीची हत्या केल्याचे जॉनने कबुल केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.