हिंगोलीत राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांना मराठा आंदोलकांकडून धक्काबुक्की

157

हिंगोली, दि. २७ (पीसीबी) – कळमनुरी तालुक्या आज (शुक्रवार) मराठा आंदोलनाने हिंसक वळन घेतले येथील काही संतप्त आंदोलकांनी एक ट्रक जाळला, तसेच साळवा पाटीवरही बाभळीचे झाड हिंगोली-नांदेड महामार्गावर आडवे पाडून आंदोलकांनी महामार्ग बंद केला. यावेळी रास्तारोको आंदोलनादरम्यान आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांना संतप्त जमावाने धक्काबुक्की केली.

मिळालेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूर येथे सकल मराठा समाजाच्यावतीने आज (शुक्रवार) दुपारी बाराच्या सुमारास रास्तारोको आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांनी हजेरी लावून माईक ताब्यात घेतला. त्यानंतर आंदोलकांना संबोधित करण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त झालेल्या जमावाने माईक हिसकावून घेत त्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार वाढत गेल्याने आमदार वडकुते यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेत थेट बाबुराव वानखेडे यांचे निवासस्थान गाठले.