‘हा’ रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा; एकाच दिवशी दोन वेगवेगळे अपघात

51

चाकण, दि. २८ (पीसीबी) – चाकण-शिक्रापूर रोडवर मंगळवारी (दि. 27) दोन अपघात झाले. या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिला अपघात मंगळवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवर मेदनकरवाडी फाट्यासमोर चाकण येथे झाला. या अपघातात संभाजी बबन भोसकर (वय 35, रा. राजगुरुनगर, ता. खेड) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत राम पांडुरंग भोसकर (वय 29) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनावरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत संभाजी भोसकर हे मंगळवारी पहाटे शिक्रापूरकडून चाकणकडे दुचाकीवरुन (एम एच 14 / डी झेड 0969) जात होते. चाकण येथे मेदनकरवाडी फाट्यासमोर त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये संभाजी गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती न देता आरोपी वाहन चालक पळून गेला. दुसरा अपघात मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवर रासेफाटा येथे घडला. या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याबाबत काळुराम पोपट मुंगसे (वय 40) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनर (सी जी 07 / बी ई 0455) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी कंटेनर चालकाने भरधाव वेगात कंटेनर चालवून रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीला जोरात धडक दिली. या अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीच्या हाताला, पायाला, डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता तसेच पोलिसांना माहिती न देता कंटेनरचालक पळून गेला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare