… हा तर जनाधार गमावलेल्या नेत्यांचा बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न

56

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी होत असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दिल्लीत गेल्यानंतर शरद पवार यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यानंतर ही बैठक होत असून, या बैठकीवरून भाजपाने चिमटा काढला आहे. शरद पवार यांच्या घरी होत असलेल्या बैठकीत उपस्थित असणाऱ्यांची यादी पाहिली, तर राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला भाजपाने लगावला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘राष्ट्रमंच’च्या बॅनरखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस व शिवसेना वगळता इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे. या बैठकीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. या बैठकीत सहभागी होणाऱ्या काही नेत्यांची नावंही उपाध्ये यांनी घेतली आहेत.

“शरद पवार यांच्या दिल्लीतील घरी बैठक… २० जण उपस्थित असणाऱ्यांची यादी पहाता संभाव्य आघाडी हा राजकारणात जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न असून, एक नवा हास्यास्पद प्रयोग यापलीकडे त्यातून काही निष्पन्न होणार नाही,” असं म्हणत केशव उपाध्ये यांनी बैठकीला उपस्थित राहणाऱ्यां नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.
१) यशवंत सिंन्हा
२) पवन वर्मा
३) संजय सिंग
४) डी.राजा
५) फारुख अब्दुला
६) जस्टीस ए. पी.शाह
७) जावेद अखतर
८) के सी तुलसी
९) करन थापर
१०) आशुतोष
११)माजीद मेमन
१२) वंदना चव्हाण
१३) एस वाय कुरेशी (Former CEC)
१५ पक्षांना निमंत्रण
’माजी केंद्रीय मंत्री व मोदींचे विरोधक मानले जाणाऱ्या यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्र मंच’ या बिगरराजकीय संस्थेने ही बैठक आयोजित केली आहे. ’समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना बैठकीचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ही बैठक बिगरभाजप आघाडीच्या शक्याशक्यतेवर चर्चा करण्यासाठी होत असली तरी, काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी तयार करण्याबाबत शरद पवार वा अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

WhatsAppShare