हाफ पँट आणि स्लीपर घातल्याने हॉटेलमधून तरुणांना काढले बाहेर

87

पुणे, दि. ११ (पीसीबी) – हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठीही आता ड्रेसकोड आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पुण्यात नुकतीच एक अजब घटना घडली आहे. हॉटेलमध्ये आलेल्या तरुणांनी हाफ पँट आणि स्लीपर घातल्याने त्यांच्यावर हॉटेल प्रशासनाने त्यांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. अशाप्रकारचे कपडे घालणे हॉटेलच्या नियमावलीत बसत नसल्याने या तरुणांना बाहेर काढण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील ‘एजंट जॅक’ या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी कोणते कपडे आणि पादत्राणे घालायची हेही हॉटेलचालक ठरवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना एक दोघांसोबत नाही तर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेल्या संपूर्ण ग्रुपसोबतच घडली.
पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये हे हॉटेल आहे. हे तरुण मंगळवारी रात्री जेवण्यासाठी या हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी या मुलांनी हाफ पँट आणि पायात स्लीपर घातल्याचे कारण पुढे करत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबत आपण आपल्या हॉटेलमध्ये नियमावलीही लावली असल्याचे हॉटेलच्या संचालकाने सांगितले. तुम्ही केलेला वेश आमच्या हॉटेलमधील सुविधा घेण्यास योग्य नसल्याने तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सगळे तरुण संगणक अभियंते असून ते नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात.
याबाबत चतु;श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित हॅाटेल चालकांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करावी असी मागणी त्या तरुणांनी केली आहे.