हर्षवर्धन पाटील की दत्तात्रेय भरणे; इंदापूरात पैज जिंकणाऱ्या कार्यकर्त्याला मिळणार मताधिक्या इतकी रक्कम

115

इंदापूर, दि. २ (पीसीबी) – इंदापूरात भाजपकडून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील  आणि  राष्ट्रवादीकडून आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या दोघांमध्ये काट्याची लढत होणार आहे. या लढतीत   विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे की, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील विजयी होणार, याबाबत दोन कार्यकर्त्यांनी स्टँप पेपरवर पैज लावली आहे. त्यामुळे ही पैज तालुक्यात चर्चेची विषय ठरली आहे.

इंदापूर मतदार संघातील जंक्शनमधील नितीन भारत साबळे आणि संभा भारत बनसोडे यांनी दोघांच्या जय-पराजयावर पैज लावली आहे. आमदार भरणे जेवढ्या मताधिक्यांनी विजयी होतील तेवढी रक्कम नितीन साबळे स्वखुशीने देणार आहेत. हर्षवर्धन पाटील विजयी झाल्यास मताधिक्याएवढी रक्कम बनसोडे हे साबळे यांना देणार आहेत. तसा त्यांनी करार केला आहे.  या लेखी पत्रकावर स्टॅम्प (तिकीट) लावण्यात आले आहे. आनंदनगर गावचे उपसरपंच रोहित मोहोळकर यांनी या पैजेच्या रकमेची जबाबदारी घेतली आहे.

नितीन भारत साबळे आणि संभा भारत बनसोडे यांच्या पैजेची इंदापूरामध्ये खमंग चर्चा सुरू झाली आहे.  तसेच सोशल मीडियावर या पैजेची जोरदार चर्चा सुरू आहे.  ही पैज कोण जिंकणार, हे समजण्यासाठी २४ ऑक्टोबर रोजी लागणाऱ्या  निकालापर्यंत वाट पाहावी  लागणार आहे.