हरलोय मी.. आता जगू शकत नाही.. मला माफ करा; औरंगाबादेत तरुणाची आत्महत्या

148

औरंगाबाद, दि. ७ (पीसीबी) – मला माफ करा, मी सोडून चाललोय सर्वांना.. मला माफ करा.. खुप त्रास होतो…. हरलोय मी.. आता जगू शकत नाही… मी मेल्यावर माझी किडनी दान करा.. अशा आशयाचा काळीज पिळवटून टाकणारा संदेश मोबाईलवर लिहून एका बेरोजगार तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली.

अमोल अशोक मिसाळ (वय २३, रा. अंबरहिल परिसर, औरंगाबाद) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमोल हा एका ठिकाणी नोकरी करत होता. १५ दिवसांपुर्वीच त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तसेच इतर ठिकाणी देखील त्याला काम मिळत नव्हते. त्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता. यामधून आलेल्या नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केली. अमोलने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवरून कुटूंबीयांना संदेश पाठवला आहे. यामध्ये मी हरलोय, त्यामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये. तसेच माझ्या देहाचे दान करावे, काळजी घ्या, असे लिहिले आहे. पोलिस तपास करत आहेत.