“हम महाराष्ट्र में नही आ रहै है, हम तो….”; ममता बॅनर्जींनी दिल स्पष्टीकरण

82

मुंबई, दि.०१ (पीसीबी) : टीएमसीच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. टीएमसीने गोवा, मेघालय आणि त्रिपुरा सारख्या राज्यांमध्ये प्रवेश केलेला असतानाच ममता बॅनर्जी या महाराष्ट्रात आल्याने त्या महाराष्ट्रातही बस्तान बसवणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हम महाराष्ट्र में नही आ रहै है, असं ममता बॅनर्जी यांनी सांगून टीएमसी महाराष्ट्राच्या राजकारणात येण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ममता बॅनर्जी या काल मुंबईत आल्या. काल त्यांनी आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण केला. संध्याकाळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत राष्ट्रीय राजकारण, सत्ताधाऱ्यांचं धोरण आणि प्रादेशिक पक्षांची भूमिका यावर त्यांनी चर्चा केली.

ममता बॅनर्जी या मुंबईत असल्याने टीएमसी महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याच्या चर्चा होत्या. ममता बॅनर्जी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. टीएमसी महाराष्ट्रात सक्रिय होणार नाही. आम्ही महाराष्ट्रात येणार नाही. मात्र, जिथं जिथं प्रादेशिक पक्ष चांगलं काम करत आहेत. ज्या राज्यात प्रादेशिक पक्ष भाजपसमोर ताकदीने उभे राहत आहेत. त्या ठिकाणी आम्ही ताकदीनं उभे राहणार आहोत. आम्ही त्या ठिकाणी शिरणार नाही. तिथे प्रादेशिक मित्रांनाच साथ देणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, ममता बॅनर्जी या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचल्या आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रीय राजकारण, विरोधी पक्षांची एकजूटता, राज्यांच्या निवडणुका आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातं. या भेटीत काँग्रेस आणि टीएमसीमधील दुरावा कमी करण्यावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पूर्वी ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिल्लीचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, भाजप नेते अमित शहा आणि नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांची पवारांसोबतचीही भेट होणार होती. मात्र, काही कारणास्तव ही भेट होऊ शकली नव्हती. त्यावेळी त्यांचं केवळ पवारांशी फोनवर बोलणं झालं होतं. आता या दोन्ही नेत्यांची भेट होत असल्याने या भेटीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

WhatsAppShare