हजारो कोटींचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक

310

लंडन, दि. २० (पीसीबी) – पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला लंडन येथून अटक करण्यात आली. अटकेनंतर नीरव मोदीला न्यायालयात हजर करण्यात आले. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होणार आहे. भारतात घोटाळा करुन फरार झालेल्या या उद्योगपतीविरोधात लंडनमधील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते. भारतात प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी आता न्यायालयात केली जाणार आहे.

सुनावणीदरम्यान नीरव मोदीने जामिनाची विनंती केली. तपास यंत्रणांना आपले पूर्ण सहकार्य राहील. प्रवासासंबंधीचे सर्व कागदपत्रे मी सादर करेन असे त्याने न्यायालयाला म्हटले. वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाकडून प्रत्यार्पण अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर अटक वॉरंट लागू केले होते. त्यानंतर नीरव मोदीला कधीही अटक केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले होते. नीरव मोदी सध्या लंडनमध्ये ऐषोरामी जीवन जगत होता.