स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही; संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर निशाणा

163

कोल्हापूर, दि. १९ (पीसीबी) – कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांसाठी  सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी रस्त्यावर लोकांकडे पैसे मागत मदत गोळा केली होती. यासंबंधी व्हिडीओ फेसबुकवर शेअर करण्यात आला होता. मात्र यावरुन राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी विनोद तावडेंच्या या कृत्याचा निषेध करत संताप व्यक्त केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भिकेची गरज नाही,  असे त्यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी फेसबुक पोस्टमध्ये  लिहिले आहे की,  स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, येथे भीक स्वीकारली जाणार नाही. पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारले आहे.

दरम्यान, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी भाजपाच्या वतीने बोरिवलीत ११ ऑगस्टला मदतफेरीचे आयोजन करण्यात आले होतं. विनोद तावडे यांच्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी मदत फेरीमध्ये सहभागी झाले होते. पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यासाठी ११० डबे तयार करण्यात आले होते. प्रत्येक डब्यात जमा होणारा संकलित निधी मुख्यमंत्री निधीच्या माध्यमातून पूरग्रस्तांपर्यंत पोहचवण्यात येत आहे.