स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने विजयादशमीनिमित्त घोराडेश्वर डोंगरावर वृक्षारोपण व शस्त्रपूजन

9

निगडी, दि. २६ (पीसीबी) – ‘दसरा’ सिमोल्लंघन, शमीपुजन, शस्त्रपूजन व पाटीपूजन अश्या विविध अंगाने विजयादशमी साजरी केली जाते. या शुभदिनी शेतकरी व कारागीर आपली अवजारे, तर विद्यार्थी आपल्या पुस्तकांची पूजा करतात. ह्या सर्व पुजेमागचा उद्देश एकच की या सर्व पूजित वस्तू देवरूपी असतात आणि वर्षभर आपल्याला एखादे काम करण्यासाठी त्या मदत करतात. तर कुदळ, फावडे, टिकाव, कोयते हे आम्हा निसर्गसेवकांची अशीच महत्वाची शस्त्र व अवजारं. यांच्या सहाय्याने वर्षभर घोरावडेश्वर डोंगरावर निसर्गसेवा करणे शक्य होत असल्याने निसर्गसेवकांनी एकत्र येऊन घोरावडेश्वर डोंगरावर शस्त्रपूजा केली. सगळी अवजारे नीट स्वच्छ करून, त्यांना व्यवस्थित मांडून, सुंदर झेंडूच्या फुलांनी सजवले. एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपापल्यापरीने प्रयत्न करू या असे आश्वासन दिले व प्रतिज्ञा घेतली.

विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी आपण सर्वाना सोनं म्हणून आपट्याचे पान देऊन सोनं घ्या, सोन्यासारखे राहा असे म्हणतो. परंतु अशमंतक म्हणजे आपटा हा बहुगुणी वृक्ष असून त्याचे पान, खोड, फळ, मूळ सर्वच औषधी गुणधर्म असल्याने त्याला सोन्याची उपमा दिली गेली व त्यामुळेच त्याचे जतन करणे खूपच आवश्यक आहे.
दसऱ्याच्या दिवशी आपट्याचे झाड पूर्णपणे ओरबाडून, तोडून, मोडून बाजारामध्ये विकण्यासाठी आणले जाते. प्रत्येकाची श्रध्दा, परंपरा नुसार त्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना दिली जातात. आपट्याचे महत्त्व जाणून त्याचे संवर्धन करण्यासाठी स्वातंत्रवीर सावरकर मंडळ निसर्गमित्र विभाग व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पर्यावरण विभाग पिंपरी चिंचवड यांच्या मार्फत यावर्षी आवाहन करण्यात आले की एक तरी आपट्याचे झाड लावू या. पर्यावरणपूरक दसरा साजरा करू या.

या अभियानाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निसर्गमित्र विभाग निगडी पुणे तर्फे घोरवडेश्वर येथे बाल निसर्गसेवकांच्या हातून एक आपट्याचे रोप लावण्यात आले. त्याचबरोबर निसर्गसेवेकांच्या त्यांच्या अवजारांचे पूजन केले. या वेळी सकाळी घोरवडेश्वर येथे सकाळी ७.०० वा. लहानथोर ३० पेक्षा जास्त निसर्गसेवक उपस्थित होते.

सिद्धार्थ गौतम बुद्ध उद्यान, महात्मा फुले नगर चिंचवड येथे आपटा व आवळा अशी दोन रोपे लावण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा चिंचवडगाव येथील गोखले पार्क व श्रद्धा गार्डन (बिल्डिंग -१९) येथे प्रत्येकी एक आपट्याचे रोप व श्रद्धा गार्डन येथे एक पिंपळाचे रोप लावण्यात आले. संत तुकाराम गटातर्फे पिंपळे गुरव, सह्याद्री कॉलनी येथे आपट्याची दोन रोपे लावली. तानाजी नगर, चिंचवड येथे एक रोप लावले.पाईट, रंदळ वाडी येथे श्री श्रीकांत मापारी यांनी शेतात आपटा व काटेसावर अशी दोन रोपे लावली. एव्हरेस्ट वीर श्री कृष्णा ढोकले यांनी घरी एक आपट्याचे रोप लावले. चिंचवड गटातर्फे पिंपरी स्मशानभूमीत आपटा -४ व ताम्हण, कवठ, बेहडा, कांचन, जांभूळ, कदंब, रिठा अशी एकूण १८ दुर्मिळ देशी रोपे पुढील २ते ३ दिवसात लावण्यात येणार आहेत. रोपे देऊन ठेवलेली आहेत.

WhatsAppShare