स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी स्मृती निमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन

116

पुणे, दि. २५ (पीसीबी) – स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानाअंतर्गत राज्यातील युवकांसाठी आर्य चाणक्य  निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेसाठी दिलेल्या विषयावर मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांपैकी एका भाषेमध्ये स्पर्धकांना टाईप करून पीडीएफ स्वरुपात निबंध सादर करावा लागणार आहे. त्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना भाषा व विषयनिहाय रोख रक्कमेचे पारितोषिक दिले जाणार आहे.

निबंध स्पर्धेसाठी आर्य चाणक्य यांची राष्ट्र उभारणीची संकल्पना, आर्य चाणक्य एक व्यवस्थापन गुरू आणि आर्य चाणक्यांची लोककल्याण (योगक्षेम) विषयी संकल्पना हे विषय असणार आहेत. या स्पर्धेत १६ ते ३० वयोगटातील सर्व युवक व युवतींना सहभागी होता येईल. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनपैकी कोणत्याही एका भाषेत दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर निबंध सादर करता येईल. त्यासाठी १००० ते २००० शब्द मर्यादा ठेवण्यात आली आहे.

स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना आपल्या निबंधाच्या खालील बाजूस आपण वापरलेल्या संदर्भाची सविस्तर सूची द्यावी लागणार आहे. स्पर्धकांना आपला निबंध टाईप करून पीडीएफ स्वरूपात https://goo.gl/forms/e3RVGTQRkNPdAkXw1 येथे अपलोड करावा लागेल. मराठी व हिंदीतून टाईप करताना फॉन्ट मंगल-देवनागरी असावा आणि फॉन्ट साईज १२ ठेवावी. इंग्रजीसाठी टाइम्स न्यु रोमन आणि फॉन्ट साईज १२ ठेवावी. दोन ओळींमधील अंतर १.५ ठेवावे. स्पर्धकांनी आपले निबंध ३० जूनपर्यंत पाठवावेत. निबंध अपलोड करताना स्पर्धकाने आपले संपूर्ण नाव, जन्म दिनांक, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल आणि स्वत:विषयी माहिती नमूद करणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील विजेत्या १८ स्पर्धकांना भाषा व विषयनिहाय पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकाला रोख पाच हजार रुपये आणि द्वितीय क्रमांकाला रोख तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत. ८ जुलै रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता पारितोषिकांचे वितरण केले जाईल. तसेच या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे “आर्य चाणक्य – जीवन एवं कार्य: आजके संदर्भ में” या विषयावर व्याख्यान होईल. अधिक माहितीसाठी राहुल टोकेकर (९८२२९७१०७९), वैभव गोडसे (९६६५०६३९२१), गंधार भांडारी (८३०८५३६६७५) यांच्याशी संपर्क साधावा.