स्वबळाच्या घोषणेनंतर शिवसेनेत दुफळी; नाराज आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात ?

385

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळाची घोषणा केली. त्याचबरोबर राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार बोलून दाखवला. मात्र, स्वबळावर लढण्यास पक्षातील आमदारांच्या एक गटाचा विरोध आहे. तर एका गटाने उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्यासमोर मोठा पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतील तरुण आमदारांमध्ये फारसे महत्त्व दिले जात नसल्याची भावना वाढू लागली  आहे. तरूण आमदारांचा एक गट शिवसेनेच्या नेतृत्त्वावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे ज्येष्ठ आमदारांना नको त्या प्रमाणात मानसन्मान दिला जात आहे. तसेच त्यांना  मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात तरूण आमदारांना डावलले जात असल्याची भावना बळावली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंनी स्वबळाची घोषणा केल्याने तरूण आमदारांची अस्वस्थता वाढली आहे. अनेकांना आपण पुन्हा निवडून येऊ की नाही, याची धास्ती वाटू लागली आहे. यामुळेच उद्धव ठाकरेंवर भाजपशी युती करण्यासाठी दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.

शिवसेना स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर ठाम राहिली, तर त्याचा फटका आपल्यालाही बसू शकतो, याची जाणीव भाजपला झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून सतत स्वबळाची घोषणा केल्यानंतरही भाजपकडून शिवसेनेचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहेत.    त्याचबरोबर भाजपकडून सेनेतील असंतुष्ट आमदारांना गळाला लावण्याचे पडत्याआडून डाव टाकले जात आहे.

असंतुष्ट आमदारांचा गट शिवसेनेत इतकाही  प्रभावी नाही. मात्र, त्यांचे उपद्रव्यमुल्य लक्षात घेता या गटाला लवकरात लवकर शांत करावे लागणार आहे. हा गट मुख्यमंत्र्यांच्याही संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या गटाचे बंड थोपवण्यात शिवसेनेला यश येते का?  हे पाहावे लागणार आहे