स्थायी समिती सभागृहातील बैठक व्यवस्थेकरिता थेट पद्धतीने 18 लाख 64 हजारांच्या खुर्च्या खरेदी करणार

58

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहातील बैठक व्यवस्थेकरिता खुर्च्या खरेदी करण्यात येणार आहेत. निविदा प्रक्रिया रद्द करुन गोदरेज अॅन्ड बायस मॅनिफॅक्चरींग यांच्याकडून तीन प्रकारच्या 89 खुर्च्या थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत. एका खुर्चीची किंमत 12 हजारांपासून 65 हजार रुपयांपर्यंत आहे. त्यासाठी 18 लाख 64 हजार 320 रुपये खर्च येणार आहे.

महापालिका इमारतीमधील तिस-या मजल्यावर स्थायी समितीचे सभागृह आहे. या सभागृहात स्थायी समितीसह विविध आढावा बैठका, विषय समित्यांच्या सभा होत असतात. कोरोनामुळे सध्या ऑनलाइन कामकाज चालत असल्यामुळे प्रत्यक्ष सभागृहातून सभा होत नाहीत. या सभागृहातील बैठक व्यवस्थेकरिता महापालिकेने परीमाण व स्पेसिफीकेशननुसार तीन प्रकारच्या खुर्च्यांची निविदा शासनाच्या महाईटेंडर प्रणालीवर प्रसिद्ध केली होती. दरपत्रे मागविण्यात आले होते. त्यामध्ये 6 निविदाकारांनी सहभाग घेतला.

सर्वात लघुत्तम निविदाकाराकडून स्पेसिफीकेशनप्रमाणे खुर्च्यांचे नमुने मागविले. या खुर्च्यांची तांत्रीक तपासणी करुन अहवाल देण्याचे मोरवाडीतील आयटीआयच्या प्राचार्यांना सांगितले. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार निविदेतील स्पेसिफीकेशन व लघुत्तम निविदाधारकाने दिलेल्या खुर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. उच्च प्रतीच्या खुर्च्या आवश्यक असल्याने आणि आयटीआयच्या प्राचार्यांचा तपासणी अहवाल बघता निविदा रद्द करण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात आवश्यक स्पेसिफीकेशनच्या खुर्च्या गोदरेज अन्ड बायस मॅनिफॅक्चरींग या कंपनीने दर कमी करुन 11 जानेवारी 2022 रोजी महापालिकेला पत्र दिले. व्हेरी हाय बॅक प्युअर लेदर चेअर 1 नग खरेदी केला जाणार असून त्याची किंमत 64 हजार 940 रुपये आहे. तर, हाय बॅक प्युअर लेदर चेअर 8 खरेदी केल्या जाणार असून एकाची किंमत 63 हजार 724 रुपये आहे. कॉन्फरन्स चेअर 80 नग खरेदी केल्या जाणार असून एकाची किंमत 12 हजार 565 रुपये आहे. अशा 18 लाख 64 हजार 320 रुपयांच्या 89 खुर्च्या गोदरेज अन्ड बायस मॅनिफॅक्चरींग कंपनीकडून थेट पद्धतीने खरेदी करण्यात येणार आहेत.