स्थायी समितीतील भाजपच्या उर्वरित पाचही नगरसेवकांचे राजीनामे मंजूर; पक्षाचा धोरणात्मक निर्णय

54

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने स्थायी समितीमध्ये पाच वर्षात ५५ नगरसेवकांना संधी देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पहिल्या वर्षी स्थायी समितीत स्थान मिळालेल्या आणि चिठ्ठीमध्ये नाव न निघालेल्या उर्वरित पाच नगरसेवकांचे महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी (दि. ९) राजीनामे मंजूर केले. त्यामध्ये नगरसेवक लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांचा समावेश आहे. या पाच जणांचे राजीनामे मंजूर केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या चार आणि अपक्ष एका नगरसेवकाची वर्णी लावण्यात येणार आहे.

भाजपने २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची १५ वर्षांची सत्ता उलथवून लावली. महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केल्यानंतर प्रशासकीय आणि राजकीयदृष्ट्या भाजपने अनेक नाविन्यपूर्ण धोरण राबविण्यास सुरूवात केली आहे. स्थायी समितीत पत्रकारांना बसविण्याचा निर्णय हा त्या धोरणाचाच भाग आहे. त्याचप्रमाणे स्थायी समितीत दरवर्षी नवीन नगरसेवकांची निवड करण्याच्या धोरणाचीही भाजपने अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे पाच वर्षात भाजपच्या ५५ नगरसेवकांना स्थायी समितीत स्थान मिळणार आहे.

महापालिकेचे सर्व आर्थिक निर्णय घेण्याची जबाबदारी असणाऱ्या स्थायी समितीमध्ये १६ नगरसेवकांची निवड केली जाते. ही निवड करताना राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची संख्या गृहित धरली जाते. १६ नगरसेवकांमधून एकाची समितीच्या अध्यक्षपदी निवड होते. राजकीय पक्षांच्या नगरसवेकांच्या संख्याबळानुसार स्थायी समितीत भाजपच्या ११ (१ अपक्ष), राष्ट्रवादीचे ४ आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाची वर्णी लागते. भाजपने पहिल्या वर्षी ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, उषा मुंढे, हर्षल ढोरे, कुंदन गायकवाड, कोमल मेवानी, लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे या ११ जणांना स्थायी समितीत संधी दिली होती.

तसेच राष्ट्रवादीने आपल्या चार आणि शिवसेनेने एका नगरसेवकाची स्थायी समितीत वर्णी लावली होती. नियमानुसार स्थायी समितीतून दरवर्षी आठ नगरसेवक निवृत्त केले जातात. चिठ्ठीद्वारे ही निवृत्ती जाहीर केली जाते. त्यानुसार सीमा सावळे, आशा धायगुडे-शेंडगे, उषा मुंढे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे, कुंदन गायकवाड या सहा नगरसेवकांना चिठ्ठीद्वारे स्थायी समितीतून निवृत्त करण्यात आले. उर्वरित लक्ष्मण उंडे, उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे या पाच नगरसेवकांचे पक्षाने राजीनामे घेतले होते. परंतु, ते मंजूर झाले नव्हते. अखेर महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी या पाचही जणांचे स्थायी समिती सदस्यपदाचे राजीनामे मंजूर केले. त्यामुळे या नगरसेवकांच्या जागेवर भाजपच्या नवीन चार आणि अपक्ष एका नगरसेवकाची स्थायी समितीत वर्णी लागणार आहे. मार्च महिन्याच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीत वर्णी लावण्यात येणाऱ्या पाच नवीन नगरसेवकांची नावे जाहीर होतील.