स्थायीच्या अध्यक्षपदी राहुल जाधव? विलास मडिगेरी, शीतल शिंदेही चर्चेत; ममता गायकवाड ठरणार “डार्क हॉर्स”?

489

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपकडून नगरसेवक राहुल जाधव, विलास मडिगेरी, शितल शिंदे, सागर आंगोळकर, नगरसेविका नम्रता नोंढे आणि ममता गायकवाड यांची निवड झाल्याने समितीच्या अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. नगरसेवक राहुल जाधव, विलास मडिगेरी आणि शितल शिंदे यांच्यापैकी एकाला स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे. त्यातील नगरसेवक राहुल जाधव यांचे राजकीय पारडे जड मानले जात आहे. त्याचप्रमाणे नगरसेविका ममता गायकवाड यादेखील ऐनवेळी “डार्क हॉर्स” ठरू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

महापालिकेत भाजपने प्रथमच एकहाती सत्ता स्थापन केली आहे. या सत्तेचे पहिले वर्ष संपले आहे. महापालिकेच्या राजकारणात स्थायी समितीला अनन्यसाधारण महत्त्व असते. या समितीकडे महापालिकेची तिजोरी सांभाळण्याची जबाबदारी असते. त्यामुळे समितीवर निवड व्हावी यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या उड्या पडत असतात. स्थायी समितीत पक्षीय संख्याबळानुसार भाजपच्या दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेना आणि अपक्षांच्या प्रत्येकी एका नगरसेवकाची निवड होते. त्यानुसार पहिल्या वर्षी नगरसेवकांची निवड होऊन स्थायी समितीचे अध्यक्षपद भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे यांना भूषविण्याची संधी मिळाली. सावळे यांची अध्यक्षपदाची मुदत २८ फेब्रुवारी रोजी संपली. त्यामुळे स्थायीचा पुढचा अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या सहा नगरसेवकांच्या जागेवर भाजपने राहुल जाधव, विलास मडिगेरी, शितल शिंदे, सागर आंगोळकर, नम्रता लोंढे आणि ममता गायकवाड या सहा नगरसेवकांची निवड केली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहुल जाधव, विलास मडिगेरी, शितल शिंदे या तिघांपैकी एकाची निवड निश्चित मानली जात आहे. त्यातही नगरसेवक राहुल जाधव हे स्थायीच्या अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. जाधव हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक आहेत. ते दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. ते पहिल्यांदा मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच विलास मडिगेरी हे सुद्धा पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामार्फत स्थायीच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांचीही स्थायीच्या अध्यक्षपदी निवड होण्याची दाट शक्यता मानली जात आहे.

नगरसेवक शितल शिंदे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. गेल्यावेळी स्थायीसाठी त्यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे ते नाराज होते. मात्र आता त्यांना पक्षाने स्थायीचे सदस्य केले आहे. नगरसेवक शिंदे हे देखील दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यामुळे ते स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी तीव्र इच्छुक आहेत. ते भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यामार्फत स्थायीचे अध्यक्षपद मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. राहुल जाधव, विलास मडिगेरी आणि शीतल शिंदे यांच्या व्यतिरिक्त नगरसेविका ममता गायकवाड यांना देखील ऐनवेळी स्थायीचे अध्यक्षपद मिळू शकते. नगरसेविका गायकवाड यांचे पती व माजी नगरसेवक विनायक गायकवाड हे गेल्या पंचवार्षिकमध्ये स्थायी समितीवर सलग दोन वर्षे सदस्य होते.

त्यामुळे नगरसेविका गायकवाड यांच्या घरी स्थायी समिती चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. राहुल जाधव, विलास मडिगेरी हे भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. मावळत्या स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे या सुद्धा भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे स्थायी समितीचे अध्यक्षपद निवडताना विधानसभा मतदारसंघांचा विचार झाल्यास चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ममता गायकवाड या अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार ठरू शकतात. तसेच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी नगरसेविका गायकवाड यांच्या पारड्यात वजन टाकल्यास त्या “डार्क हॉर्स” ठरू शकतात. भाजपमधील अंतर्गत राजकारणामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात स्थायीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.