स्कूलबस, खासगी वाहतूकदार आज देशभरात एकदिवसीय संपावर

59

मुंबई, दि. २० (पीसीबी) – पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होणारी दरवाढ, टोलसह विविध मागण्यांसाठी स्कूल बस अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशन आणि  ऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने आज देशभरात एकदिवसीय संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शाळांची विद्यार्थी वाहतूक आज बंद राहणार आहे.

या संपात सर्व खासगी वाहतूकदारांनी सहभाग घेतला आहे. या बंदमध्ये स्कूल बस, खासगी बससह खासगी कॅब, ट्रक, टेम्पो ही वाहनंसुद्धा सहभागी होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपापल्या जबाबदारीवर बस सुरू ठेवाव्यात, असे असोसिएशनने म्हटले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जीएसटीअतंर्गत आणाव्यात, इंधनाचे दर सहा महिन्यातून एकदा निश्चित करावेत, मुंबईतल्या सर्व टोल नाक्यांवर टोलमाफी द्यावी, राज्यातील सर्व टोलनाक्यांवर स्कूल बसचा प्रवास मोफत करावा, आरटीओऐवजी वार्षिक वाहन तपासणी स्कूल बस सेफ्टी समितीनं करावी, शाळेभोवती पार्किंगला जागा मिळावी, खड्डेमुक्त रस्ते आदी मागण्यांसाठी खासगी वाहतूकदारांनी ही एकदिवसीय बंदची हाक दिली आहे.