सौर उर्जेवर चालणारे शीतगृह शेतक-यांसाठी नवसंजीवनी – उपमुख्यमंत्री अजित पवार

263

पुणे, दि. १५ (पीसीबी) : वातावरणातील वाढलेले उष्णतेचे प्रचंड प्रमाण आणि राज्यातील वीजेचे संकट यामुळे सध्या शेतकरी वर्गासोबत अनेक जण त्रस्त आहेत. वाढत्या उष्णतेचा वापर सौरऊर्जा उपकरणाद्वारे करून शीतगृहाच्या मदतीने शेतमालाची साठवून योग्य प्रकारे केली जाऊ शकते. शेतक-यांनी आधुनिकतेची कास धरणे गरजेचे आहे. शेतमालाची गुणवत्ता टिकवण्यासाठी व साठवणूक करण्यासाठी शेतक-यांना कोल्डस्टोरेज एक वरदान ठरणार आहे. वीजेचे वाढते दर, मागणी आणि पर्याप्त वीजेची कमतरता यामुळे पूर्णवेळ सौर उर्जेवर चालणार्‍या शीतगृहाचा पर्याय फायदेशीर ठरत असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील म्हाळुंगे(इंगळे) परिसरात भारतातील पहिले पूर्णवेळ सौर उर्जेवर चालणारे कॉल्डलॉक या शीतगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जीएस महानगर को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक उदय शेळके, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, ग्रीनर-शिया एनरकॉप प्रायवेट लिमिटेडच्या शिल्पा नाकतोडे, रोशन ठुबे, सिद्धार्थ जगताप, सिद्धांत सुरसे आदी मान्यवर उपस्थित होते.

बाजारात मालाची आवक जास्त प्रमाणात आल्यामुळे त्याचे दर घसरतात. तर ग्राहकांची मागणी वाढली की मालाला किंमत जास्त मिळते. त्यासाठी शेतमाल योग्यवेळी बाजारात दाखल झाला पाहिजे. शेतमालाची गुणवत्ता ठिकवण्यासाठी व योग्य पद्धतीने साठवणूक होण्यासाठी दिवसेंदिवस वाढत चाललेले विजेचे संकट लक्षात घेत, ग्रामीण भागातील गरज ओळखून तसेच शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने एकत्र येत काही तरुणांनी पूर्णवेळ सौरऊर्जेवर चालणारे शीतगृहाचा अभिनव प्रकल्प सुरु केला. ग्रीनर-शिया एनरकॉप प्रायवेट लिमिटेडद्वारे हा प्रकल्प उभारण्यात आला असून अनिल बोत्रे यांच्याकडून हा प्रकल्प राबवला जात आहे. ग्रामीण भागात वीज भाराची ठराविक मर्यादा आहे. अशा ठिकाणी या सौरऊर्जेवर चालणार्‍या शीतगृहांमुळे शेतकर्‍यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतील.