सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मांजरीचा मृत्यू; तब्बल ७०० कोटींची होती मालकीण

212

न्यूयॉर्क, दि. १४ (पीसीबी) – सध्याचा जमाना हा सोशल मीडिया ट्रोलिंगचा आहे. सोशल मीडियावरुन एखाद्याची खिल्ली उडवण्यासाठी किंवा ट्रोल करण्यासाठी आपण अनेकदा विविध प्रकारच्या मिम्सचा वापर करतो. या मिम्समध्ये एका रागीट चेहऱ्याच्या मांजरीचा वापर सर्रास केला जातो. या मांजरीचे नुकतेच निधन झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही मांजर आपल्यामागे तब्बल ९ कोटी ८५ लाख अमेरिकी डॉलर (७०० कोटी रुपये) इतकी संपत्ती सोडून गेली आहे.

सोशल मीडियावरुन प्रसिद्ध झालेल्या या मांजरीचे खरे नाव ‘टार्डर सॉस’ असे होते. परंतु चाहते तिला ‘ग्रम्पी’ या टोपण नावाने ओळखायचे. अमेरिकेतील एरिझोना शहराची रहिवासी असलेल्या ‘तबथा बुंडसेन’ हिने ग्रम्पी कॅटचे पालन पोषन केले होते. तिने ट्विट करुन ग्रम्पीच्या निधनाची दु:खद बातमी दिली.

२०१० साली मांजरींसाठी आयोजीत केलेल्या एका स्पर्धेमुळे ग्रम्पी कॅट सर्वात प्रथम चर्चेत आली होती. या स्पर्धेत काढले गेलेले तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. पुढे याच फोटोंचा वापर सोशल मीडियावर ट्रोलिंगसाठी केला जाऊ लागला. ग्रम्पीची वाढती लोकप्रियता पाहून तिच्या मालकीणीने तिच्या चेहऱ्याचा विमा देखील उतरवला होता. चेहऱ्यावरील रागीट हावभावामुळे ती इतर मांजरांपेक्षा वेगळी दिसत होती. फेसबुकवर तिचे ८५ लाख, इन्स्टाग्रामवर २५ लाख आणि ट्विटर वर तब्बल १५ लाखांपेक्षाही जास्त फॉलोअर्स होते. तिच्यावर ‘ग्रम्पी कॅट्स वर्स्ट ख्रिसमस एव्हर’ हा चित्रपट तयार करण्यात आला होता. तसेच अनेक टीव्ही मालिका व कार्टूनमध्येही ग्रम्पी झळकली होती. स्टॅन ली, जेनिफर लोपेज, ब्रिटनी स्पिअर यांसारख्या कित्येक लोकप्रिय सेलिब्रिटींनी तिच्या सौंदर्याची स्तुती केली होती. तिने आपल्या १२ वर्षांच्या कारकिर्दीत तुफान लोकप्रियता मिळवली होती.

तिने चित्रपट व सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल ७०० कोटी रुपयांची संपत्ती जमा केली होती. ग्रम्पी कॅटचे वयाच्या १४व्या वर्षी निधन झाले. तिच्या निधनाची बातमीने चाहत्यांना खुप दु:ख झाले आहे.

 

WhatsAppShare