सोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घाला – धनंजय मुंडे

79

नागपूर, दि.११ (पीसीबी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. पण मोदींचा पक्ष आणि मंत्री संविधान बदलायला निघाले आहेत. तेच लोक भटके समाज चिरडून टाकायला मागे-पुढे पाहणार नाहीत. ही मानसिकता वाढीस लागली असून, ती ठेचून काढण्याची गरज आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राईनपाडा घटनेवर संताप व्यक्त केला. तसेच ही घटना अफवेतून घडली असून, ती पसरवणाऱ्या सोशल मीडियाच्या अतिरेकाला आळा घालण्यासाठी कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
धुळ्यातील राईनपाडा गावात हिंसक जमावाने पाच जणांची हत्या केली होती. हा मुद्दा धनंजय मुंडे यांनी अल्पकालीन नियम ९७ अन्वये विधानपरिषदेत उपस्थित केला. शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी आणि प्रगतशील महाराष्ट्रासाठी राईनपाडाची घटना अत्यंत लाजिरवाणी आहे. समाजातील गरीब, दुर्बल, वंचित आणि उपेक्षित घटकातील या पाच जणांची इतक्या अमानुषपणे हत्या होते; परंतु समाजातून दबका आवाज वगळता निषेधाचा तीव्र सूरही उमटत नाही, अशी खंतही मुंडे यांनी व्यक्त केली.
अफवेच्या गैरसमजातून पाच जणांची हत्या केली जाते. अशा हत्या करण्यास समाज किंवा जमाव का प्रवृत्त होत आहे याचा विचार करुन ही प्रवृत्ती ठेचून काढण्याची गरज असल्याचेही मुंडे म्हणाले. पाच निरपराधांची हत्या करणाऱ्या जमावाला कायद्याची भीती का वाटत नाही? अशी हत्या करण्यास समाज का प्रवृत होतो? या झुंडशाहीमागील सूत्रधार, तसंच विचारसरणी शोधावी, असेही ते म्हणाले.