सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला ‍हिंसक वळण; दोन एसटी बसची तोडफोड

72

सोलापूर, दि. २१ (पीसीबी) – मराठा समाजाचा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (शनिवार)  मराठा क्रांती मोर्चाच्या सोलापूर शाखेने शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दोन एसटी बसची तोडफोड केली.त्यामुळे या आंदोलनाला ‍हिंसक वळण लागले. चक्काजाम आंदोलनामुळे तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट आणि पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

शिवाजी चौक आणि संभाजी चौकात आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. मोर्चानंतर मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. आश्वासन देऊनही त्यांनी त्याची पूर्तता केली नाही. आषाढी पालखी सोहळा सुरळीत व्हायचा असेल तर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात पाय ठेवू नये, मोठा उद्रेक होईल, असा इशारा सोलापूर सकल मराठी समाजाने दिला आहे.

लातूर-सोलापूर मार्गावरील औसा येथील मुख्य चौकात सकल मराठा समाजाने ठिय्या आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. लातूर-सोलापूर आणि लातूर-उमरगा रस्त्यावर मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन केले. अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.