सोलापुर बंद दरम्यान पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक; पोलिसांचा जमावावर लाठी चार्ज

196

सोलापुर, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आज (सोमवार) मराठा क्रांती मोर्चाने सोलापुर बंदची हाक दिली होती. या ‘बंद’ला  चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील जवळपास सर्व बाजारपेठा बंद आहेत. मात्र बंद दरम्यान काही आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठी चार्ज केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सोलापूर बंद पुकारण्यासाठी पांजरापोळ चौकात मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र आला होता. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. तर पार्क चौकात पोलिसांच्या वाहनावर तसेच अग्निशामक दलाच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर लाठी चार्ज केला. तसेच काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. सोलापूर बंदमध्ये सार्वजनिक वाहतुकीसह शाळा-महाविद्यालये, सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीतील दैनंदिन व्यवहार बंद आहेत. मराठा समाजाच्या या बंदला चेंबर ऑफ कॉमर्स , सराफ असोसिएश, कम्युनिस्ट पार्टी,प्रहार संघटना आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.