सोमाटणे फाट्याजवळ कारला भीषण अपघात; तीन गंभीर जखमी

70

सोमाटणे, दि. ३ (पीसीबी) – सोमाटणे फाटा पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुरक्षा पट्टीला धडकली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली स्टील पट्टी कारच्या आरपार घूसली. या भीषण अपघात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास पुण्याहून मुंबई महामार्गावर झाला.

अमोल शिवाजी पाटील (वय ३९), श्रीमंत कृष्णा भोंदे (वय ४५) आणि प्रकाश गोविंद वाईगडे (वय ४५, सर्व रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सूर्याजी कृष्णा भोंदे (वय ३९, रा. सिल्व्हर पार्क, मीरा भाईंदर) यांना किरकोळ जखम झाली आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारमधील प्रवाशी दोन दिवसांपूर्वी काही कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. सोमवारी (दि. 2) रात्रीच्या सुमारास कोल्हापूरवरून मुंबईच्या दिशेने जात होते. आज पहाटेच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सोमाटणे पुलाजवळ कार आली असता, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा पट्टीला धडकली. कारचा वेग जास्त असल्याने स्टीलची सुरक्षा पट्टी कारमधून आरपार घूसली.

दरम्यान, यात तीन जण जखमी झाले असून जखमींना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस तपास करत आहेत.