“सोमवारच्या भारत बंद जनआक्रोश आंदोलनात सहभागी व्हा”: डॉ. कैलास कदम

92

“उद्योग, व्यवसाय बंद ठेवून केंद्र सरकार विरुध्द निषेध नोंदवा” : संजोग वाघेरे पाटील

पिंपरी, पुणे दि. 23 (पीसीबी) संयुक्त किसान मोर्चा, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, जन आंदोलन संघर्ष समिती आणि महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सोमवारी (दि. 27) जनआक्रोश आंदोलन करीत भारत बंदचा नारा दिला आहे. या भारत बंदमध्ये पिंपरी चिचंवड शहरातील सर्व कामगार बंधू, भगिनींनी, शेतक-यांनी, नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भांडवलदार धार्जिण्या सरकारने शेतक-यांचे हित डावलून शेती विषयक तीन काळे कायदे मंजूर केले. तसेच कामगारांचे हक्क दुर्लक्षित करुन चार कामगार कायदे केले. याबाबत सरकार कोणाशीही चर्चा करायला तयार नाही. दिल्लीच्या प्रवेशव्दारावर गेल्या नऊ महिण्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. तसेच चारही कामगार कायदे मागे घेऊन पुर्वीचेच कामगार कायदे असावेत या मागणीसाठी देशातील सर्व कामगार संघटना लढा उभारत आहेत. या शेतक-यांना आणि कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जनजागृती करीत सोमवारी (दि. 27) देशव्यापी भारत बंद पुकारण्यात आला आहे. याबाबत शहरात ठिकठिकाणी कोपरा सभा आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात गुरुवारी (दि. 23 ) साने चौक चिखली येथून करण्यात आली. यावेळी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते जनआक्रोश रथाचे उद्‌घाटन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते मानव कांबळे, नगरसेविका संगिता ताम्हाणे, माजी नगरसेवक मारुती भापकर, ज्येष्ठ कामगार नेते वसंत पवार, पांडूरंग गडेकर, अनिल रोहम, गणेश दराडे, अर्पणा दराडे तसेच कॉंग्रेस युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, हिराचंद जाधव, काशिनाथ नखाते, यश दत्ताकाका साने, विकास साने, विलास आण्णा साने, बाळासाहेब मोरे, रंगनाथ जाधव, विठ्ठल मोरे, प्रमोद ताम्हाणे, शुभम दिघे, बाळासाहेब पवार, प्रविण गोडसे, अशोक ठाणगे, भरत जाधव, रामचंद्र बांगर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. कदम यांनी आवाहन केले की, केंद्रातील मोदी, शहा यांचे भाजपाचे सरकार शेतकरी आणि कामगारांच्या विरोधात जाऊन अंबानी, अदानी सारख्या मुठभर भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेत आहे. या कायद्यांमुळे देशातील बळीराजा आणि कष्टकरी, संघटीत, असंघटीत सर्व क्षेत्रातील कामगार देशोधडीला लागणार आहेत. आपल्या पुर्वजांनी इंग्रजांविरुध्द लढून जे कामगार हिताचे कायदे मंजूर करुन घेतले. ते आता रद्द करुन कामगारांना त्यांच्या पुढच्या पिढीला गुलामगिरीत ढकलणारे कायदे मोदी, शहा यांच्या सरकारने केले. केंद्र सरकारने हे कायदे मागे घ्यावेत यासाठीच सोमवारच्या जनआक्रोश आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असेही आवाहन कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केले.

संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, भाजपचा गल्ली ते दिल्ली भ्रष्टाचाराचा कार्यक्रम सुरु आहे. रोज वाढत जाणा-या इंधन दरवाढीमुळे महागाईने कळस गाठला आहे. सर्वसामान्य नागरीकांना आपली रोजची उपजिवीका चालविणे देखिल कठीण झाले आहे. समाजातील सर्व घटकांना महागाईची झळ बसत आहे. भाजप आणि केंद्र सरकारच्या विरुध्द हा नागरीकांचा रोष सोमवारच्या जनआक्रोश आंदोलनात दिसला पाहिजे. यासाठी नागरीकांनी आपले उद्योग, व्यवसाय बंद ठेवून केंद्र सरकार विरुध्द निषेध नोंदवावा असे आवाहन संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.

जनआक्रोश आंदोलनाची माहिती देण्यासाठी गुरुवार पासून रविवार पर्यंत शहरात ठिकठिकाणी कोपरा सभा होणार आहेत. यामध्ये शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी 5 वाजता निगडी चौकात लोकमान्य पुतळा ; सायंकाळी 6:30 वाजता विठ्ठल मंदिर, आकुर्डी चौक ; सायंकाळी 7:30 वाजता दत्त मंदिर चौक मोहननगर, चिंचवड ; शनिवारी (दि. 25) सायंकाळी 5 वाजता रामकृष्ण मोरे कार्यालय, सांगवी ; सायंकाळी 6:30 वाजता कुणाल हॉटेल कॉर्नर, रहाटणी फाटा, काळेवाडी ; रात्री 8:30 वाजता दत्त मंदिर रोड, आर्य मेडीकल कॉर्नर वाकड ; रविवारी (दि. 26 ) सायंकाळी 5 वाजता वाल्हेकर वाडी चौक, सायंकाळी 6:30 वाजता चापेकर चौक, चिंचवड गाव ; रात्री 8 वाजता शगुन चौक, पिंपरी येथे सभा होणार आहेत. तसेच सोमवारी (दि. 27 ) सकाळी 9 वाजल्यापासून पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात जनआक्रोश आंदोलन सुरु होणार आहे अशी माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी यावेळी दिली.

या जनआक्रोश आंदोलनात इंटक, आयटक, सिटू, टी.यु.सी.सी, राष्ट्रवादी कामगार सेल, भारतीय कामगार सेना, श्रमिक एकता महासंघ, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ, प्रहार जनशक्ती पक्ष, हिंद कामगार संघटना, ग्रीव्हज कॉटन एंड अलाईड कंपनीच एम्पॉईज युनियन, पूना एम्प्लॉईज युनियन (आयटक), बँक एम्प्लॉईज फेडरेशन, ऑल इंडिया डीफेन्स फेडरेशन, संरक्षण, पोस्ट, बी.एस.एन.एल. केंद्र सरकारी (नर्सेस व अन्य) अंगणवाडी, बालवाडी, आशा कर्मचारी, पथारी – फेरीवाले, घर कामगार संघटना, विद्यार्थी व युवक संघटना, कात्रज दुध उत्पादक संघ, संघटना इंटक, बँक कर्मचारी संघ इंटक आदी कामगार संघटना सहभागी होणार आहेत.
प्रास्ताविक मारुती भापकर, सुत्रसंचालन पांडुरंग गडेकर आणि आभार यश साने यांनी मानले.

WhatsAppShare