सोनेरी आमदार रमेश वांजळेंची कन्या भोसरीची सून होणार; भोसरीच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता

0
30849

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – सोनेरी आमदार म्हणून राज्यभरात नावलौकिक प्राप्त केलेले मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे या भोसरीच्या सून होणार आहेत. भोसरीतील उद्योजक आदित्य शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह होणार आहे. सायली वांजळे या पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत.

रमेश वांजळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोनेरी आमदार म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. अंगावर अडीच किलोंचे सोन्याचे दागिने घालणाऱ्या रमेश वांजळे यांना महाराष्ट्रातील चांद्यापासून ते बांद्यापर्यंत ओळखले जात होते. बोटातल्या अंगठीत मनेसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिमा आणि गळ्यातल्या लॉकेटमध्ये राज ठाकरेंचीच प्रतिमा ठेवून त्यांनी अल्पावधीतच एक डॅशिंग आमदार म्हणून नाव कमावले होते. विधानसभेत हिंदीतून शपथ घेणारे आमदार अबू आझमींचा माईक हिसकावून घेतल्याने रमेश वांजळेंना अवघ्या महाराष्ट्राने पाहिले होते.

हवेली तालुक्यातील अहिरे गावचे सरपंच, हवेली तालुका पंचायत समिती सदस्य ते खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे आमदार झालेल्या रमेश वांजळे यांचा जून २०११ मध्ये ह्दयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पत्नी हर्षदा वांजळे यांनी खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली. मात्र भाजपच्या भीमराव तापकीर यांनी त्यांचा पराभव केला. दिवंगत रमेश वांजळे यांची कन्या सायली वांजळे यांनीही आता राजकारणात प्रवेश केला आहे.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत सायली वांजळे या वारजे भागातून पुणे महापालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. आता त्या पिंपरी-चिंचवडच्या म्हणजेच भोसरीच्या सून होणार आहेत. सायली वांजळे यांचे भोसरीतील उद्योजक आदित्य शिंदे यांच्यासोबत लग्न ठरले आहे. सोनेरी आमदाराची मुलगी भोसरीची सून होणार असल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पुणे महापालिका नगरसेवकपदाची टर्म संपल्यानंतर त्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत उतरून आपला राजकीय प्रवास कायम ठेवतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.