सैनिकांच्या हौतात्म्याची जुमलेबाजी करू नका- उद्धव ठाकरे

153

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना रोखण्यास असमर्थ ठरल्यावरून शिवसेनेनं केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रात सांगली, जळगाव महापालिका आणि राज्यसभेत उपसभापतीपद जिंकले, पण काश्मिरातील दहशतवादावर निर्णायक विजय कधी मिळवणार? आणखी किती मेजर राणेंचे बलिदान घेणार याचे उत्तर द्या आणि मगच २०१९च्या निवडणुकांना सामोरे जा. सैनिकांच्या हौतात्म्याची तरी जुमलेबाजी करू नका, अशी खरमरीत टीका शिवसेनेने भाजपवर केली.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना मिरारोड येथील मेजर कौस्तुभ राणे हे शहीद झाले. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. शहीदांना श्रद्धांजली वाहणे आणि पुष्पचक्र अर्पण करणे हेच जणू राज्यकर्त्यांचे काम झाले आहे. त्यातच ते समाधानी आहेत, असे ठाकरेंनी म्हटले. सैनिकांच्या बलिदानानंतर डीजे वाजवून गोंधळ घालणाऱ्यांचे राज्य आम्हाला नको. तसे नक्राश्रु ढाळणाऱ्यांचेही नको. मग कुणी काय समजायचे ते समजो, असे ते म्हणाले.